अक्षरधाम बॉम्ब हल्ल्याच्या सूत्रधाराचे पुणे कनेक्शन उघड
पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या 'इसिस' जाळ्याचा पर्दाफाश
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पुण्यात अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांचा म्होरक्या दिल्ली पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत गुजरातमधील अक्षरधाम बॉम्ब हल्ल्याच्या सूत्रधाराचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. तसेच त्याच्या अटकेने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राजधानीतील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कटही उधळला गेला आहे.
इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या रिझवान अली या दहशतवाद्याचा वावर दिल्लीच्या दरियागंज भागात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. आपण पोलिसांच्या सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच रिझवान याने पोलिसांवर गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या काही फैरी झडल्यानंतर पोलिसांनी त्याला जेरबद केले.
रिझवान हा दरियागंजचाच रहिवासी असून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट तो आखत होता. त्यासाठी त्याने दिल्लीतील वर्दळीच्या आणि प्रामुख्याने प्रतिष्ठित परिसरांची रेकी केली असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. पाकिस्तानातून दहशतवादी टोळी चालविणाऱ्या फराहतुल्ला घोरी याच्या आदेशानुसार तो काम करीत असे. घोरी हा गुजरात मधील अक्षरधाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.
पुणे पोलिसांनी इमरान खान आणि युनूस सकी या दोन संशयित दहशतवाद्यांना जुलै 2023 मध्ये पुण्यातील कोंढवा येथून अटक केली होती. त्यांचा एक साथीदार शाहनवाज आलम हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, दिल्ली पोलिसांनी 2 ऑक्टोबर 2023 मध्ये त्याला दिल्लीच्या जैतपूर भागातून अटक केली. या शाहनवाजला इसिसच्या जाळ्यात ओढण्याचे काम रिझवानने केले आहे. रिझवान आणि शाहनवाज या दोघांवरही राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रत्येकी तीन लाख रुपयांचे इनाम लावले आहे.
रिझवान हा समाज माध्यमाद्वारे दहशतवादी विचारसरणीकडे ओढला गेला आणि सन 2017 पासून इसिससाठी भारतात काम करू लागला. झारखंड येथे राहणारा त्याचा नातेवाईक शाहनवाज शिक्षणासाठी दिल्लीत आला. इथे त्यांची चांगली मैत्री जमली. शाहनवाजला मक्का, मदीना या धर्मस्थळांची यात्रा करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी रिझवानने त्याला प्रथम स्थानिक गुन्हेगारी कृत्यांमध्ये आणि नंतर दहशतवादी गटात सामील करून घेतले. शाहनवाज सन 2008 पासून भारतात इसीससाठी काम करू लागला. पुढे हे दोघे एप्रिल 2022 पासून इमरान आणि युनूस यांच्या संपर्कात आले. त्यांनी पुण्यात फोटोके आणि बॉम्ब तयार करणे, दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करणे, दहशतवादी चळवळीसाठी निधी गोळा करणे आणि प्रत्यक्ष संपर्क व समाज माध्यमाद्वारे युवकांना दहशतवादाकडे आकर्षित करणे, असे काम चालू केले. मात्र, या सर्वांची सूत्र घोरी हा पाकिस्तानात बसून चालवत आहे.
Comment List