'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्वाळा
शिर्डी: प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महायुतीतील अंतर्गत बाबींवर चर्चाही अंतर्गतच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा 'भटकती आत्मा' असा उल्लेख केला होता. लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका महायुतीला सहन करावा लागला. मोदी यांच्या या विधानामुळे शरद पवार यांच्या बद्दल राज्यभरात असलेल्या सहानुभूतीत वाढच झाल्याचे मतदानात बघायला मिळाले.
मात्र, याबद्दल आता काही भाष्य करणे योग्य होणार नाही. मागच्या सगळ्या बाबी सोडून देऊन या निवडणुकीत आम्ही फक्त विकासाबाबत बोलणार आहोत. राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा नगर जिल्ह्यात पोहोचली असून अजित पवार यांनी प्रमुख नेत्यांसह शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जिरंगे पाटील यांची आग्रही मागणी आहे तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीवर इतर मागासवर्ग ठाम आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याच्या विशेषता ग्रामीण भागात मराठा आणि इतर मागासवर्ग यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्ष या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विरोधी नेत्यांची संवाद साधला असून पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याला हे नेते उपस्थित राहतील, असे पवार यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याबाबत नो कॉमेंट्स
राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ ज्या ज्या उमेदवारांच्या प्रचाराला जातील त्या त्या उमेदवारांचा आम्ही पराभव करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. याबद्दल विचारणा केली असता अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांना धक्का लागणार नाही
केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित केल्या असून त्यासाठी संयुक्त संसदीय समिती ही स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावावरून दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गोंधळ झाला. याबाबत अजित पवार गटाची भूमिका काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी वक्फ बोर्डाच्या राज्यातील मालमत्तांना कोणताही धक्का लागणार नाही. त्या बोर्डाकडून काढून घेऊन इतर कोणाच्या घशात जाऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महायुतीकडून राज्यसभेची जागा आम्हालाच
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भारतीय जनता पक्षासाठी सोडला. त्यामुळे राज्यसभेत पियुष गोयल यांची रिकामी झालेली जागा महायुतीकडून आम्हाला मिळेल. त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आपल्या पक्षाची संसदीय समिती घेईल, असेही पवार यांनी सांगितले.
Comment List