'तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, माझ्या नादी नका लागू'
राज ठाकरे यांचा सुपाऱ्या फेकणाऱ्यांना आणि जाब विचारणाऱ्याना इशारा
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो. मात्र, माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझे कार्यकर्ते असे काही करतील की घरी जाऊन आरशात तोंड, पाठ आणि पोट बघावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना आरक्षणाबाबत जाब विचारणाऱ्यांना आणि त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकणाऱ्यांना पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे धाराशिव येथे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते त्या ठिकाणी मराठा आरक्षणाबाबत ठाकरे यांच्या भूमिके संबंधी विचारणा करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी ठाकरे यांची भेट होईपर्यंत तिथेच ठिय्या मांडण्याचा पवित्रा घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याचप्रमाणे मनसे हा सुपारीबाजांचा पक्ष असल्याचा आरोप करून बीड येथे ाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर सुपार्या फेकण्यात आल्या. या प्रकारांबद्दल ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट आहे, असे सांगत ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, या विधानाचा पुनरुच्चार केला. शाहू महाराजांनी गरजवंतांना आरक्षण द्यावे, असे सांगितले होते. त्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळणे आवश्यक होते.. इथे मात्र सगळे जातीचे राजकारण चालले आहे. त्यामुळे राजकारणाचा चिखल झाला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
मराठा आंदोलकांच्या नावाखाली शिवसेनेची हुल्लडबाजी
काल मराठा आंदोलकांच्या नावाखाली जिल्हाप्रमुखासह शिवसैनिकांनी 'एक मराठा, लाख मराठा,' या घोषणा देत आपल्यासमोर हुल्लडबाजी केली. आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला. ऐनवेळी जर पोलीस मध्ये पडले नसते तर त्यांची काही खैर नव्हती, असेही ठाकरे यांनी सांगितले.
... मग आरक्षण देण्यापासून तुम्हाला अडवले कुणी?
केंद्रात दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. आपण शरद पवार यांच्या बोटाला धरून राजकारणात आलो, असे मोदी सांगत होते. त्यावेळी पवार यांनी मोदी यांना सांगून मराठा आरक्षणावर तोडगा का काढला नाही? उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर पाच वर्ष सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी मोदी यांची मदत घेऊन या प्रश्नावर मार्ग का काढला नाही, असे सवाल राज ठाकरे यांनी केले. साधारणपणे 2005 च्या दरम्यान मराठा आरक्षणासाठी मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच भूमिका मांडली. मग तुमचे सगळ्यांचे एकमत असेल तर मराठा समाजाला आरक्षण द्यायला तुम्हाला अडवले कुणी, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
Comment List