Ajit Pawar : अजित पवार साधणार मावळातील जनतेशी संवाद ; आमदार सुनील शेळके यांची पत्रकार परिषदेत माहिती
योजना पुढे सुरू राहण्यासाठी पुन्हा महायुती सरकार आवश्यक’; आमदार सुनील शेळके
वडगाव मावळ/सतिश गाडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा दि १६ रोजी शुक्रवारी मावळ तालुक्यात दाखल होणार आहे या यात्रेदरम्यान अजित पवार मावळ तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी ही माहिती दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे उपस्थित होते.
यावेळी आमदार शेळके म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रेची सुरुवात नाशिकमध्ये होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित रहाणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. जन सन्मान यात्रा तळेगाव दाभाडे येथे सकाळी १० वाजता मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर येणार आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना, जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या सन्मान यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींशी देखील ते संवाद साधणार आहेत. शेती पंपांवरील वीज बिल माफी तसेच मावळातील पर्यटन, कृषी पर्यटनाला कशी गती मिळेल याबाबत अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत, अशीही माहिती शेळके यांनी दिली.
मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 55 हजारांहून अधिक माता-भगिनींनी नावनोंदणी केली. या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान 80 हजार भगिनींना मिळाला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपले प्रयत्न सुरू आहेत. या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना राखी पौर्णिमेनिमित्त भेट द्यावी, असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.
‘योजना पुढे सुरू राहण्यासाठी पुन्हा महायुती सरकार आवश्यक’
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी महत्त्वाकांक्षी योजना महायुती सरकारने जाहीर केली असून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. योजना पुढे चालू राहावी, असे वाटत असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी महायुती सरकारलाच प्रचंड बहुमताने निवडून देणे आवश्यक आहे, असे आमदार शेळके म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये अशी योजना राबविण्याची धमक नाही. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर आली तर योजना बंद केली जाण्याचा धोका आहे, असा इशाराही शेळके यांनी दिला.
Comment List