विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी भाजपचे विशेष प्रचारक
रावसाहेब दानवे, फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावरही विशेष जबाबदारी
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्ष काटेकोर प्रयत्न करत असून त्या अनुषंगाने या निवडणुकीचे विशेष प्रचारक म्हणून केंद्रातील कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही विशेष जबाबदारी असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला. विशेषतः भाजपचा प्रभाव असलेल्या विदर्भात काँग्रेसने तब्बल सात जागा मिळवल्या तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली. राज्यभरातील लोकसभेचे 48 जागांपैकी महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाल्यास महायुतीला सत्तेतून उतार व्हावे लागेल हे निश्चित आहे. असे घडू नये यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी राज्याचा कानाकोपरा पिंजून काढणार आहेत.
लवकरच विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर होणार असून रावसाहेब दानवे हे या समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत. या समितीत अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश केला जाणार आहे.
Comment List