'दिलीप मोहिते यांना मंत्रिपदाचा शब्द हे निव्वळ गाजर'
खेड आळंदी मतदारसंघात शिदे गट आणि अजित पवार गटात खडाजंगी
पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला मंत्रिपदाचा शब्द म्हणजे निव्वळ गाजर आहे. प्रत्यक्षात मोहिते पाटील हे विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत, असे मत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यावरून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात खडाजंगी सुरू असल्याचे दिसून आले.
सन 2019 मध्ये या पुढची विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत दिलीप मोहिते पाटील यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले होते. दिलीप मोहिते पाटील हे शब्द पाळणारे आमदार आहेत. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक ते लढवणार नाहीत, अशा शब्दात पोखरकर यांनी मोहिते पाटील यांना उपरोधिक टोला लगावला.
दिलीप मोहिते पाटील ही निवडणूक लढवणार नाहीत कारण त्यांना पराभव समोर दिसतो आहे. ते निवडणूकच लढवणार नसल्यामुळे अजित पवार यांनी त्यांना दिलेला मंत्रीपदाचा शब्द म्हणजे केवळ दाखवलेले गाजर आहे, असा दावाही पोखरकर यांनी केला.
Comment List