'आपल्या उत्साहाचा इतरांना त्रास नको'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना सूचना
पुणे: प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत स्पीकर्स आणि डी जेच्या आवाजाचा इतरांना त्रास होऊ नये याची काळजी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. आपल्या उत्साहाचा इतरांना त्रास होऊ देऊ नये, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
केवळ पुणेकरांचेच नव्हे तर देशभरातील गणेश भक्तांचे भक्तिस्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीचे पूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाहण्याबाबत पोलीस आयुक्तांनी पत्रक काढून निर्देश जारी केले आहेत. गणेशोत्सव मंडळांनी या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांना आवाजाचा त्रास होऊ देऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
जागावाटप अंतिम टप्प्यात
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. काही जागांवर वाद आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही प्रमुख पक्षांचे नेते चर्चा करून निर्णय घेतील. त्यानंतर जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांचीच इच्छा
राजकारणात कार्यरत असलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना आपण मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा असते. मी देखील त्याला अपवाद नाही. मात्र, मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी बहुमत मिळवणे आवश्यक असते. या विधानसभा निवडणुकीत वैयक्तिक महत्त्वाकांक्षांपेक्षा महायुतीला बहुमत मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
Comment List