'राजकारणाचे अध:पतन रोखण्यासाठी हस्तक्षेप करा'
मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांकडून विरोधी नेत्यांवर ज्या भाषेत टीका केली जात आहे, त्यामुळे राजकारणाचे अध:पतन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये हस्तक्षेप करून खालच्या पातळीची टीका करणाऱ्या नेत्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
योग्य वेळी आरक्षण रद्द करण्याचा विचार करू. सध्या तरी ती वेळ आलेली नाही, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात केले होते. तसेच शीख समुदायाबद्दलही त्यांनी काही विधान केले होते. या विधानावरून आरक्षणविरोधी असल्याचा आरोप करून भाजप आणि मित्रपक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर कठोर टीका केली जात आहे.
भाजपाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखी अवस्था करून टाकू, अशी धमकी दिली होती तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला अकरा लाखाचे इनाम जाहीर केले आहे.
अशा प्रकारच्या विधानांमुळे संतापलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र रवाना केले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतानाच मोदी यांनी राजकारणाची पातळी कायम राखण्यासाठी त्यांच्या पक्षातील व मित्र पक्षातील बोलघेवड्या नेत्यांची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
देशाचे राजकारण सुरळीत चालावे यासाठी निकोप वातावरण आवश्यक असते. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी हे वातावरण दूषित होत आहे. अशा वक्तव्यांनी केवळ राहुल गांधी यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो असे नाही तर देशातील राजकारणाची पातळी खालावत आहे. हा केवळ राहुल गांधी यांचा अपमान नाही तर विरोधी पक्षातील सर्वांचा अपमान आहे, असेही खरगे यांनी नमूद केले आहे.
Comment List