दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आतिशी यांचा दावा
नायब राज्यपाल विनायक कुमार सक्सेना यांच्याकडे प्रस्ताव सादर
नवी दिल्ली: प्रतिनिधी
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी नाट्यमय रित्या राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र विद्यमान शिक्षण व सार्वजनिक बांधकाम मंत्री आतिशी यांच्याकडे जाणार आहेत. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्याकडे केला आहे.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दीर्घकाळ कारागृहात काढून जामिनावर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर लागलेला कलंक जनतेच्या न्यायालयातून दूर झाल्यावरच पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ, असे जाहीर करत केजरीवाल यांनी राजीनामा दिला आहे.
केजरीवाल यांना न्यायालयाच्या निर्बंधांमुळे मुख्यमंत्री म्हणून विशेष निर्णय घेणे तसेही शक्य नव्हते. त्यातच त्यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करून विरोधकांना, विशेषतः भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्काच दिला आहे. गंभीर आरोप असून आणि दीर्घकाळ कारागृहात घालवूनसुद्धा मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याच्या केजरीवाल यांच्या आग्रहावर भाजपकडून सातत्याने टीका केली जात होती. मात्र, राजीनामा देऊन केजरीवाल यांनी या टीकेतील हवा काढून टाकली आहे.
आतिशी या उच्चविद्याविभूषित आणि स्वतंत्र आचार विचार असलेल्या नेत्या आहेत. त्या केजरीवाल यांचा रबरी शिक्का म्हणून मुख्यमंत्री पद सांभाळतील की खरोखर स्वतःच्या मताप्रमाणे सरकार चालवतील, असा सवाल व्यक्त केला जात आहे. मात्र, खुद्द आतिशी यांनीच आपण काळजीवाहू पंतप्रधान असल्याचे जाहीर केले आहे.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हा अतिशय भावना विवश करणारा क्षण आहे. मात्र, केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवण्याचा चंग दिल्लीच्या जनतेनेच बांधलेला आहे. त्यामुळे पुन्हा विधानसभेची निवडणूक होईपर्यंत आपण दिल्लीची आणि दिल्लीतील जनतेची काळजी घेऊ, असे त्या म्हणाल्या.
भावी मुख्यमंत्र्यांची पार्श्वभूमी तपासा
आम आदमी पक्षाने दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची निवड केली आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र, दिल्लीच्या या भावी मुख्यमंत्र्यांची पार्श्वभूमी तपासून घेणे गरजेचे आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांनी व्यक्त केले आहे. आतिशी यांच्या मातापित्यांनी दहशतवादी अफजल गुरू याला माफी मिळावी म्हणून राष्ट्रपतींकडे अर्ज केला होता. खुद्द आतिशी यांनी देशाचा अवमान करणाऱ्यांची पाठराखण केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
Comment List