'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...'
भाजप खासदाराचीही जीभ घसरली
अमरावती: प्रतिनिधी
राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम देण्याच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे उठलेला धुरळा बसत नाही तोच भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटू नये पण जिभेला चटके द्यावे, असे विधान केले आहे. त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.
गायकवाड यांनी केलेली जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. मात्र, गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेली विधाने भयानक आहेत. विदेशात जाऊन कोणी जर वात्रटपणाची विधाने करत असतील तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत, असे डॉ. बोंडे म्हणाले.
चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव आणि अंध:श्रद्धा निर्मूलन चळवळीचे श्याम मानव यांच्यावरही डॉ. बोंडे यांनी टीका केली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे भारतातील बहुसंख्यांक जनतेच्या भावना दुखावल्या जातात याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्याही जिभेला चटके द्यावे, असे ते म्हणाले.
डॉ. बोंडे यांच्या या विधानावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. डॉ. बोंडे यांचे मानसिक संतुलन ढळले असल्याची टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावती काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. डॉ. बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही ठाकूर यांनी दिला.
Comment List