'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे मत
लंडन: वृत्तसंस्था
भारत अनेक क्षेत्रांमध्ये करीत असलेली प्रगती लक्षात घेता सन 2050 पर्यंत जगात केवळ तीन महासत्ता अस्तित्वात असतील. त्यामध्ये अमेरिका, चीन यांच्यासह भारताचा समावेश असेल. त्यामुळे जगभरातील देशांना भारताशी सलोख्याचे संबंध ठेवणे गरजेचे आहे, असे मत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी व्यक्त केले.
अमेरिकेतील थिंक टँक असलेल्या मिल्केन इन्स्टिट्यूटच्या वार्षिक कार्यक्रमात ब्लेअर बोलत होते.
भारत विविध क्षेत्रात, विशेषतः अंतराळविज्ञान, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात भारत उल्लेखनीय प्रगती करीत आहे. आगामी काळात जगात अमेरिका, रशिया आणि भारत या तीन महासत्ता अस्तित्वात असतील. जगाला निर्णायक वळण देणारे निर्णय हे तीन देशच घेणार आहेत, असे ब्लेअर यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थांचा अहवाला देऊन ब्लेअर म्हणाले की, या दशकाच्या अखेरीपर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. भारताची सर्वच क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. जगातील अनेक देशांनी भारताचे वर्चस्व मान्य केले आहे. शिवाय भारत आणि अमेरिका यांचे संबंध मित्रत्वाचे आहेत.
अमेरिका आणि चीन या देशातील परस्पर संबंधांचा आढावाही ब्लेअर यांनी घेतला. अमेरिका आणि चीन हे एकमेकांचे शत्रू आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे देश सोडत नाहीत. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातही अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष आहे. त्यामुळेच अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर प्रचंड कर लादला आहे, याकडे ब्लेअर यांनी लक्ष वेधले. सेमी कण्डक्टर चिप्स उत्पादनाचे क्षेत्र चीनमध्ये विकसित होऊ नये यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.
Comment List