स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांना न्यायालयाचा सवाल
चेन्नई: वृत्तसंस्था
आपण आपल्या मुलीचा विवाह करून तिला संसारात सुस्थापित करून दिले. मग इतरांच्या मुलींना संन्यासी बनवून आश्रमात राहण्याचा उपदेश का करता, असा सवाल न्यायालयाने अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांना केला आहे.
जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनच्या आश्रमात संन्यासी म्हणून राहणाऱ्या दोन बहिणींच्या निवृत्त प्राध्यापक असलेल्या एस कामराज या पित्याने ईशा फाउंडेशनच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एसएम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती वी शिवगमन यांच्या खंडपीठाने जग्गी वासुदेव यांना हा प्रश्न विचारला आहे.
आश्रमात राहणाऱ्या दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीचे वय 42 तर धाकट्या बहिणीचे वय 39 वर्षे आहे. दोन्ही बहिणी उच्चशिक्षित आहेत. मोठ्या बहिणीने विदेशातून एम तेकची पदवी घेतली आहे. घटस्फोट झाल्यानंतर तिने योग शिकवणारे वर्ग सुरू केले. त्यानंतर या दोन्ही भगिनी ईशा फाउंडेशन च्या आश्रमात दाखल झाल्या.
स्वतःच्या मुलीचे लग्न लावून देणाऱ्या जग्गी वासुदेव यांनी आपल्या मुलींना संन्यासी होण्यासाठी त्यांचे 'ब्रेन वॉश' केले. आश्रमात त्यांना अशा पद्धतीचे अन्न व औषधे दिली जातात, की ज्यामुळे त्यांची विचार करण्याची शक्ती नष्ट झाली आहे, असा आरोप याचिकाकर्त्या निवृत्त प्राध्यापकांनी केला आहे. न्यायालयाने हस्तक्षेप करून आपल्या दोन्ही मुलींची आश्रमातून सुटका करावी, अशी विनंती कामराज यांनी केली आहे.
या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दोन्ही संन्यासी बहिणींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे अधिक देण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने आश्रमात आलो आणि रहात आहोत, असे सांगितले. या दोघींनी स्वेच्छेने आपल्या आयुष्याचा मार्ग निवडला असेल, तर त्यावर आक्षेप घेण्याचे कोणालाही कारण नाही, असा युक्तिवाद ईशा फाउंडेशनच्या वकिलांनी केला.
आपण कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात नाही. मात्र, आपल्या मुलीचा विवाह करून देणाऱ्या जग्गी वासुदेव यांनी इतर मुलींना संन्यासी होऊन, मुंडण करून आश्रमात राहण्यासाठी प्रोत्साहित का केले, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असे न्यायालयाने नमूद केले. प्रत्येकाला न्याय मिळणे आवश्यक आहे अशी आपली भूमिका असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.
Comment List