म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
लाडकी बहिण योजना निरंतर सुरु राहणार असल्याची आ. गोरेंनी दिली ग्वाही |
म्हसवड दि. १
राज्यात देवाभाऊ तर माण - खटावमध्ये जयाभाऊ जोवर महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तोवर त्यांच्या लाडक्या बहिणींना कशाचिही चिंता नसल्याचे मत म्हसवड येथे संपन्न झालेल्या लाडकी बहिण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना हजारो महिलांनी व्यक्त केले.
दरम्यान म्हसवड येथील आयोजित कार्यक्रमात लाडक्या बहिणींना आश्वासित करताना आ. गोरे म्हणाले की राज्यात महायुती सरकारने लाडक्या माता भगिनींना सक्षमपणे आणि सन्मानाने जगता यावे म्हणून दरमहा दीड हजार रुपये देणारी आणि इतर योजना राबवण्याचा निर्णय पुढील पाच वर्षांसाठी घेतला आहे. विरोधक सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेला विरोध करत आले आहेत. त्यांना ही योजना बंद पाडायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण आणि महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेल्या सर्व योजना पुरेशा निधीची तरतूद करून आमचे सरकार यापुढेही निरंतर सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
आ. गोरे पुढे म्हणाले की लाडकी बहीण ही निवडणूक डोळ्यासमोर सुरु केलेली योजना नाही. ही योजना अशीच पुढे सुरु राहणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आमचे सरकार कोट्यवधी बहिणींना फक्त दीड हजार रुपये देऊन थांबले नाही तर जन्माला येणाऱ्या मुली अठराव्या वर्षी लखपती होणार आहेत. लखपती दीदी, वयोश्री योजना सुरु आहे. एसटी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आहे. मुलींचे उच्च शिक्षणही मोफत होत आहे. तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. महिलांच्या सन्मानार्थ इतक्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत. आ. गोरे पुढे म्हणाले, माझ्या मतदारसंघात उसाचे कांडे पिकत नव्हते. इथल्या जनतेला मात्र मी दुष्काळमुक्तीचे आणि बागायती शेतीसह कारखानदारीची स्वप्ने दाखवली होती. आज १५ वर्षांत झालेल्या जलक्रांतीमुळे मतदारसंघात चार चार साखर कारखाने सुरु झाले आहेत. गेल्या १५ वर्षांत अथक परिश्रम करून विविध पाणी योजनांना तब्बल साडेबारा हजार कोटींचा निधी मिळवल्यामुळेच हा सकारात्मक बदल पहायला मिळाला आहे.
यावेळी लाडक्या बहिणींसाठी हास्य जत्रा हा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी म्हसवडसह पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद लुटला.०००
Comment List