एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मान!
पुणे : आपल्या धडाडीच्या पत्रकारितेने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच, समाजातील असंख्य वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आले होते. या पत्रकारांनी तीन दशकांहून अधिक कालावधीत शोध पत्रकारिता करीत, चुकीच्या गोष्टींचा प्रखर विरोध केला. त्याचप्रमाणे विविध मुद्द्यांवर अग्रलेखाद्वारे समाजाच्या भावना मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक मुद्द्यांवर परखडपणे लिखाण केले आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांना समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर (मुंबई), ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे(पुणे), बाळासाहेब बडवे (पंढरपूर), आचार्य प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा(अहमदनगर), डॉ.सुकृत खांडेकर (मुंबई), जयप्रकाश दगडे (लातूर), राजा माने (मुंबई), डॉ. सुब्रतो रॉय (पुणे), विनायक प्रभू (मुंबई) आणि मोहम्मद वजीरुद्दिन (मुंबई)यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि पदक देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकारांचा सन्मान करून, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने एकप्रकारे समजाचा सत्कार करण्याचे काम केले आहे. यावेळी पत्रकारितेचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित असल्याने, त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांनी व्यक्त केली
यावेळी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस आणि या परिषदेचे मुख्य समन्वयक प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविक करीत, कार्यक्रमाची भूमिका विषद केली. प्रा. डॉ. मिलिंद पत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
000
Comment List