हरियाणात भाजपची विजयाकडे वाटचाल
जिलब्या वाटून साजरी करणार हॅट्ट्रिक
नवी दिल्ली: प्रतिनिधी
अनेक निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा अहवाल खोटा ठरवत भारतीय जनता पक्षाची हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयाकडे वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करून भाजपा हरियाणा त हॅट्रिक करणार आहे. राज्यभरात जिलब्यांचे वाटप करून भाजप आपला विजयोत्सव साजरा करणार आहे. या निवडणुकीदरम्यान हरियाणामध्ये जिलब्यांचे राजकारण चांगलेच रंगले आहे.
वास्तविक सलग दहा वर्ष हरियाणामध्ये सत्ता राबविणाऱ्या भाजपच्या विरोधात हवा असल्याचे चित्र निवडणुकीपूर्वी दिसून आले होते. कोणताही पक्ष दीर्घकाळ सत्तेवर राहिल्यानंतर सर्वांच्या सर्व अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्या पक्षांना सत्ताविरोधी वातावरणाला सामोरे जावे लागते. मात्र लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या कथितामुळे (narrative) भाजपच्या नाकी दम आणणाऱ्या काँग्रेसला त्याच भाषेत उत्तर देण्यास भाजप यशस्वी ठरला आहे.
कुमारी शैलजा या काँग्रेसच्या हरियाणातील लोकप्रिय नेत्या आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कडून कुमारी शैलजा यांना डावलून माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांना सर्वाधिकार देण्यात आले. कुमारी शैलजा या दलित समाजाच्या असून त्यामुळेच काँग्रेस कडून त्यांना डावळण्यात आल्याचे कथित भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आले आणि त्यामुळे दलित मतदार काँग्रेस पासून दुरावला गेल्याची निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत भूपिंदर सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला या तीन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव असल्याचे प्रचार मोहिमेदरम्यान दिसून आले. विशेषतः हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्याचे प्रचार मोहिमेत जाहीररित्या दिसून आले. त्यामुळे सरकार विरोधी वातावरण असूनही त्याचा लाभ काँग्रेसला उठवता आला नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. भाजपला आसमान दाखवण्याच्या इराद्याने नेते, कार्यकर्ते मैदानात उतरले होते. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या 10 पैकी पाच मतदारसंघात विजय प्राप्त करणे काँग्रेसला शक्य झाले. मात्र, राज्यात दहा वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला, अर्थात कार्यकर्त्यांना आलेली मरगळ या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोवली.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी बऱ्यापैकी संघटित प्रयत्न करणाऱ्या इंडी आघाडीला राज्यातील विधानसभा निवडणुकीत खिंडार पडले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसकडे 90 पैकी दहा जागांची मागणी केली होती. समाजवादी पक्षानेही दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, सरकार विरोधी वातावरणामुळे अतिआत्मविश्वास असलेल्या काँग्रेसने आपल्याच इंडिआघाडीतील घटक पक्षांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाराज झालेल्या आम आदमी पक्षाने तब्बल 29 जागांवर आपले उमेदवार उभे केले. या पक्षांना निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवता आला नसला तरीही काँग्रेसची मते खाण्याचे काम त्यांनी निश्चितपणे पार पाडल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे.
जिलबीचे राजकारण, काँग्रेस आणि भाजप
काँग्रेसच्या प्रचार मोहिमेदरम्यान राहुल गांधी यांना दिपेंद्र हुड्डा या उमेदवाराकडून हरियाणातील एका प्रसिद्ध जिलेबी च डबा भेट म्हणून देण्यात आला. राहुल गांधी यांनी जाहीर सभेत या जिलेबीचे कौतुक केले. अशा जिलब्यांचे मोठे मोठे कारखाने निर्माण व्हावेत, त्यात जिलब्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात व्हावी, त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यावरून विशेषतः समाज माध्यमांमध्ये राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचे लक्ष्य करण्यात आले. जिलब्यांची भली मोठी फॅक्टरी, त्यात काम करणारे हजारो कामगार किंवा शेतात जिलब्यांची लागवड अशी छायाचित्र प्रसिद्ध करून राहुल गांधी यांची टिंगल करण्यात आली. तरीही काँग्रेसने निकालाच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयात जिलब्या वाटल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून जिलबी वाटप करूनच विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
Comment List