... त्यांच्या विरोधात आंदोलन कधी करणार?
रूपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळे यांना सवाल
पुणे: प्रतिनिधी
महिला अत्याचाराबाबत आवाज उठवण्याचा देखावा करणाऱ्या सुप्रिया सुळे आपल्या आणि मित्रपक्षातील कलंकित पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज कधी उठवणार? आंदोलने कधी करणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.
मागच्या आठवड्यात सामूहिक बलात्काराचा प्रकार घडलेल्या बोपदेव घाटात सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह भेट देऊन या ठिकाणी चोख सुरक्षा ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्याबाबतची पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली. त्यावरून चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
हा देखावा कशासाठी?
आपण पुण्यात असूनही आणि गुन्हा घडला ते ठिकाण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येत असूनही घटनास्थळी भेट देण्यास आपल्याला बरेच दिवस लागले. या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी पहिल्या दिवसापासून तब्बल 12 पथके स्थापन करून कसून तपास सुरू केला आहे. मग हा आपला देखावा कशासाठी, असा सवाल चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप
चंद्रपूर जिल्ह्यात बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा शिक्षक युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समाज माध्यम विभागाच्या प्रदेश सरचिटणीसावर महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करणे, अश्लील टिपण्णी करणे असे चार गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला आपण नियुक्तीपत्र देता. नक्की कशाचे समर्थन करता, असा सवाल चाकणकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भानुदास मुरकुटे यांच्यावर अहमदनगर येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद कधी घेणार? आंदोलन कधी करणार, अशा प्रश्नांची सरबत्ती चाकणकर यांनी केली आहे.
Comment List