'महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात'
फडणवीस यांनी केला ८० टक्के जागांचा निर्णय पक्का झाल्याचा दावा
नागपूर: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून राज्यातील ८० टक्के मतदारसंघांबाबत निर्णय पक्का झाला आहे. उर्वरित २० टक्के मतदारसंघांचा निर्णय करून लवकरच जागावाटप जाहीर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भातील पाच वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तब्बल ५२ वसतिगृहांचे उद्घाटन, नागपूर विमानतळाचे भूमिपूजन अशा विकास कामांच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल आणि आपल्याला त्यांना चार बोल लावण्याची संधी मिळेल, अशा अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तयारीत बसले होते. मात्र, हरियाणा विधानसभा निकालाने त्यांचे डोळे उघडले आहेत. देशातील वातावरणाची त्यांना कल्पना आली आहे. त्यामुळे कालपर्यंत एकत्रित असलेले महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष आता एकमेकांना 'हम आप के है कौन,' म्हणत आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपच्या विरोधात असत्य कथित (fake narrative) पसरवले होते. आता विरोधकांचे हे खोटे कथित निष्प्रभ झले असल्याचे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Comment List