भाजपचा मोठा मासा शरद पवार यांच्या गळाला
संजय काकडे आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांसह हाती घेणार तुतारी
पुणे: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वाची कामगिरी करणारे ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक आणि माझी खासदार संजय काकडे भाजप सोडून दहा आजी-माजी आमदार आणि तब्बल वीस नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याची माहिती खुद्द काकडे यांनीच दिली आहे.
मुळात काँग्रेसी विचारांची नाळ असलेले संजय काकडे राज्यसभेवर अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपची कास धरली. इतर पक्षातील प्रभावशाली नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना भाजपमध्ये आणून महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यामध्ये काकडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. सन 2019 आणि 2024 यावर्षी लोकसभा निवडणूक लढविण्याची काकडे यांची इच्छा होती. मात्र, भाजपकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काकडे हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे.
आता खुद्द काकडे यांनीच ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. आपण मागील दहा वर्ष पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. मात्र, पक्षाकडून आपल्या पदरी केवळ उपेक्षाच आली. आपल्यासह कार्यकर्त्यांची पक्षात गळचेपी करण्यात आली. दरम्यानच्या काळात शंकर पवार यांना पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली असता त्यांनी आपण स्वतः देखील पक्षात यावे असा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहाला मान देऊन आणि कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून आपण दसऱ्यानंतर सर्वसमावेशक आणि सर्वांना संधी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहोत. केवळ औपचारिकता म्हणून आपल्या या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना देणार आहोत, असे संजय काकडे यांनी सांगितले.
संजय काकडे हे जनमतावर निवडून येणारे अथवा मतदारांवर प्रभाव असणारे नेते नाहीत. मात्र, त्यांची आर्थिक क्षमता, राजकीय व्यवस्थापन करण्याची क्षमता आणि राजकीय विश्लेषण करण्याची क्षमता मागील काही काळात सिद्ध झाली आहे. त्यामुळे संजय काकडे यांच्या भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या निर्णयाचा बऱ्यापैकी फटका भाजपला बसू शकणार आहे.
Comment List