'शिंदे- पवार यांच्यातील बेबनावाच्या बातम्या हा विरोधकांचा कट'
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्या पसरविणे हा महाविकास आघाडीच्या कटाचा भाग असून त्यांच्याकडून मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
एका कामाच्या फाईलवर सही करण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. अजित पवार यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही. महायुतीचे सर्व नेते एकदिलाने काम करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावे
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारस आहेत आणि अजित पवार हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वारस आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी राजकारणात एकत्र यावे, असा आपला आग्रह आहे. काही काळापूर्वी आपण त्या दृष्टीने प्रयत्नही केला. मात्र, त्याला दोन्ही बाजूंकडून प्रतिसाद मिळाला नाही. तरीही पवार आणि आंबेडकर यांना एकत्र आणण्यासाठी आपले प्रयत्न कायम सुरूच राहतील, असेही मिटकरी म्हणाले.
Comment List