'पाडीपाडीचे राजकारण करू नका'
छत्रपती संभाजीराजे यांची मनोज जरांगे पाटील यांना विनंती
मुंबई: प्रतिनिधी
पाडापाडीचे राजकारण करू नका. त्या ऐवजी आपले जास्तीत जास्त लोक विधानसभेत कसे जातील आणि आपले प्रश्न सभागृहात कसे मांडले जातील यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील आणि आपले उद्दिष्ट एकच आहे. ते साध्य करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. पाडापाडीचे राजकारण न करता आपले अधिकाधिक लोक विधानसभा निवडणुकीत निवडून येतील आणि त्यांच्याकडून समाजाच्या समस्या सभागृहात मांडल्या जातील आणि त्यावर मार्ग शोधला जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास उमेदवार पाडण्याचा इशारा त्यांनी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना दिला आहे. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेट अमलात आणावे या जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक असलेल्या छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. त्यांना नुकतीच राजकीय पक्ष म्हणूनही मान्यता मिळाली असून त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्यासह महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून छोट्या प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून केला जात आहे.
Comment List