पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार;आमदार सुनिल शेळके
एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ;शनिवारी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
वडगाव मावळ / प्रतिनिधी
मावळ पॅटर्न’ हा चार कुटुंबांपुरता मर्यादित असून ठराविक लोकांविरुद्ध संपूर्ण जनता अशी ही लढाई असून आपण एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही आडनावाच्या विरोधात ही निवडणूक नाही.पाच वर्षे तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मते मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वडगाव मावळ येथे झालेल पत्रकार परिषदेत आमदार शेळके बोलत होते. यावेळी या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे विठ्ठलराव शिंदे, भरत येवले, एकविरा देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे, भाजप नेते देवीदास कडू, सुरेश दाभाडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे आदी उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वडगाव मावळ येथे झालेल्या सभेत विरोधकांनी केलेले सर्व आरोप आमदार शेळके यांनी फेटाळून लावले. महाआघाडी पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज भरताना वक्त्यांनी अत्यंत बेताल व वैयक्तिक बदनामी करणारी वक्तव्य केली, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह आहे. लोकशाहीने सर्वांना भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पण त्याचा गैरवापर वक्त्यांनी केल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा अर्ज का भरला, याबाबत काहीही न बोलता बहुतेक सर्व वक्त्यांनी केवळ सुनील शेळकेला लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आमदार शेळके यांनी केला.
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती आमदार शेळके (Sunil Shelke) यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भाजप कार्यकर्त्यांना स्पष्ट करतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संयुक्त बैठक झाली. महायुतीत उमेदवारीवरून तेढ असलेल्या मतदारसंघांमध्ये समन्वयासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आले. मावळातून मला व बाळा भेगडे यांना बोलावण्यात आले होते. मी पोहोचण्यापूर्वी आधी १० मिनिटे फडणवीस व बाळा भेगडे यांच्यात चर्चा झाली. आमदार शेळके यांनी भाजपच्या तिकिटावर लढावे, असे आम्ही सांगत होतो, मात्र त्यांनी न ऐकल्याने बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे बाळा भेगडे यांनी फडणवीस यांना सांगितले, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.
भाजपच्या नेत्यांनी रवींद्र भेगडे यांना भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासही सांगितले. त्यालाही मी सहमती दर्शवली होती, असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला. त्यांनी उमेदवारी अर्ज बरोबर एबी फॉर्म जोडला की नाही माहित नाही, असेही ते म्हणाले. मावळातून कमळ निवडून आले काय किंवा घड्याळ निवडून आले काय, महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. कमळ निवडून आले तरी मला आनंदच होईल, मात्र महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या उमेदवाराला कदापि निवडून येऊ देणार नाही, असे शेळके म्हणाले.
कार्यकर्त्यांना दमदाटीची ‘ऑडिओ क्लिप’
महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या गुंडांकडून दमदाटीचे फोन जात आहे, असा आरोप करीत आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. खेडोपाड्यात अपरात्री २-३ वाजता कोणाच्याही घरात जाऊ नका. कोणालाही दमदाटी करू नका, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. हे प्रकार थांबले नाहीत तर या दहशती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठेल, मावळची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शेळके यांनी दिला.
शनिवारी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
जनतेच्या विश्वासावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शनिवारी वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली. सध्या भाजपचे कार्यकर्ते दबून आहेत, मात्र चार तारखेनंतर ते सर्वजण खुलून प्रचारात उतरतील, असा दावा शेळके यांनी केला.
Comment List